Chandrapur : एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असताना दुसरीकडे राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. अशातच आता काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. बाळु धानोरकर गेले तेव्हापासून काँग्रेस पक्षातीलच काही लोक आपला विरोध करीत आहेत. या विरोधामुळेच आपल्या पतीचा जीव गेला. पक्षातील लोकांनी खासदार धानोरकरांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आता ते आपल्या पाठीमागे देखील लागले आहेत. एक जीव गेला. दुसरा जीव जाणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य वरोड्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
आपण भाजपात जाणार अशा अफवा पसरविल्या जात आहेत. त्यासाठी माध्यमांना अमीश देऊन चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. विरोधकांनी कितीही अफवा पसरविल्या, तरी त्याला घाबरणार नाही. आपण काँग्रेसचे आहोत. काँग्रेसच्या तिकिटावरच निवडणूक लढविणार आहोत, असा इशारा प्रतिभा धानोरकर यांनी दिला. प्रतिभा धानोरकर यांनी कोणाचेही नाव न घेतल्याने त्या नेमक्या कोणाबद्दल बोलत आहेत? याच्या चर्चा रंगल्या आहेत. चंद्रपूर ही आपल्या हक्काची जागा आहे, ती सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिभा धानोरकर या पत्नी आहेत. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.