Akola : राष्ट्रीय बॉक्सिंग अकॅडमी, रोहतक, हरियाणा येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय कनिष्ठ राष्ट्रीय निवड प्रक्रियेत अकोल्याच्या सुहानी बोराडे हीने आपल्या कौशल्याचा प्रयोग करित, हरियाणा, पंजाब, मणिपूर आणि दिल्लीच्या बॉक्सर्सला पराजीत करून यश मिळवीले. ती भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली.
सुहानी बोराडे ही अकोला येथील दयानंद अँग्लो वेदिक (DAV) शाळेची विद्यार्थीनी असून, 8 व्या वर्गात शिकते. ती वसंत देसाई स्टेडियमच्या अनिवासी क्रीडा प्रबोधनीची बॉक्सर आहे. यापूर्वी तिने महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. सुहानीने लहान वयात अकोला आणि महाराष्ट्रासाठी सुवर्ण आणि अनेक पदके जिंकली आहेत. राष्ट्रीय आणि राज्य स्पर्धा तसेच, पश्चिम भारत बॉक्सिंग स्पर्धेतही यश मिळवीले आहे. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक, सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक व आता या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून भारतीय संघात आपले स्थान पक्के करण्यात यश मिळवीले आहे. बॉक्सिंग प्रशिक्षक सतीशचंद्र भट आणि सहयोगी प्रशिक्षकांकडून सुहानी प्रशिक्षण घेत आहे. अकोला जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र क्रीडा विभाग आणि क्रीडाप्रेमींनी सुहानी बोराडेला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.