Eve Teasing : उत्सवाचे कारण पुढे करीत अकोला शहरात दररोज शेकडो दुचाकी वाहने विना नंबर प्लेट फिरविण्यात येत आहेत. दुचाकीवर तीन जण प्रवास करताना जाणीवपूर्वक नंबर प्लेट काढून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार अकोला शहरात वाढला आहे. रात्री साडेआठ नंतर बाहेर निघणारे हे टवाळखोर रात्रभर शहरातील वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घालत असतात. कामानिमित्त बाहेर फिरणाऱ्या युवती, महिलांची छेडखानी करीत असतात.
दुचाकीवर नंबर असलेल्या अशाच आठ ते दहा जणांनी शहर कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका युवतीला कट मारल्याचा प्रकार नुकताच घडला. विशेष म्हणजे शहर कोतवाली पोलिसांचे गस्त वाहन गांधी चौकातील दुर्गा देवी मंदिराजवळ थांबलेले असताना पोलिसांसमोरूनच हे टवाळखोर निघाले. हा प्रकार घडत असताना एका नागरिकांने पोलिसांच्या 112 या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल केली. तक्रारीचा क्रमांक CFS18627918 असा आहे. मात्र कोतवाली पोलिसांनी केवळ फोनवरून प्रतिसाद दिला.
शहरात टवाळखोरांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस आणि पोलिस स्टेशनचे कर्मचारी कार्यरत असतात. त्यामुळे टवाळखोर पकडले जातील अशी बोळवण शहर कोतवाली पोलिसांकडून फोनवर करण्यात आली. मात्र नंबरप्लेट शिवाय रात्रभर धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याला पकडण्यासाठी कोणताही उपाय करण्यात आला नाही. शहराच्या वेगवेगळ्या भागात रात्री साडेआठ नऊनंतर असे टोळके नियमितपणे बाहेर पडत आहे. उत्सवाच्या नावाखाली हे टोळके दुचाकीवर तीन ते चार जण बसून प्रवास करतात. वाहनाला कोणतीही नंबरप्लेट नसते. त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यास पोलिस साप निघून गेल्यावर काठ्या मारत बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद मोठ्या प्रमाणावर चिघळून त्याचे पर्यावरण जातीय तणावात झाले असते. हा वाद थोडक्यावर संपला. मात्र पोलिसांनी जी. श्रीधर आणि संदीप घुगे यांनी पोलिस अधीक्षक असतानाच्या काळात केलेल्या चुका करणे कायम ठेवल्यास अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसा पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन करून काही प्रमाणात लोकांवर वचक बसविता येतो. रात्रीच्या अंधारात खरे समाजकंटक शहरभर फिरत असतील तर त्याला प्रतिबंध घालत वेळीच कारवाई करणे गरजेचे झाले आहे.