अकोला : हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे तारीख १६ ते २२ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान फोंडा गोवा येथे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर यांनी दिली. यावेळी जिल्हा सह समन्वयक अॅड. श्रुती भट, हिंदू विधीज्ञ परिषदेचे मुकुंद जालनेकर, राष्ट्र जागृती मंचाचे संस्थापक अध्यक्ष संजय ठाकूर उपस्थित होते.
अधिवेशनाला नेपाळसह भारताच्या २८ राज्यातील ३५० पेक्षा अधिक हिंदू संघटनांचे १ हजार ५०० पेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यंदाच्या अधिवेशनात प्रामुख्याने हिंदू राष्ट्र संसद या सत्राचे आयोजन केले आहे. विविध प्रकारचे जिहाद, हलाल सर्टिफिकेशन, धर्मांतर, गोहत्या, मंदिर मुक्ती, संस्कृतीचे रक्षण, काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन, पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तसेच हिंदू राष्ट्राच्या पायाभरणीसाठी महोत्सवात विचारमंथन होईल.
अधिवेशनाला अमरावती येथील श्री रुख्मिणी वल्लभपीठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य, स्वामी रामराजेश्वराचार्य सरकार, विश्व हिंदु परिषद देवगिरी प्रांत संपर्क प्रमुख हभप गजानन महाराज मेटे, इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, शांती काली आश्रम, त्रिपुराचे स्वामी चित्तरंजन महाराज, शदाणी दरबार छत्तीसगडचे डॉ. युद्धीष्ठीरलाल महाराज, श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान छत्तीसगडचे श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, महात्यागी सेवा संस्थान गोंदियाचे महंत श्रीरामज्ञानीदास महात्यागी महाराज, हिंदू फ्रंट फॉर जस्टीसचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन, तेलंगणाचे आमदार टी. राजासिंह, हिंदू इकोसिस्टिमचे कपिल मिश्रा, अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, समविचारी सामाजिक, राष्ट्रीय, अध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच अकोला जिल्ह्यातील १० संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.