Achalpur : शनिवार 13 एप्रिल रोजी दुपारी एक व्यक्ती दुचाकीने गांजा घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदूरबाजार ते अचलपूर मार्गावर त्या दुचाकीस्वाराला थांबवले असता, त्याच्याकडे गांजा असल्याचे लक्षात आले. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना, त्याने चाकू काढून पथकातील पोलिसावर हल्ला चढवला. हल्ल्यात एक पोलिस अंमलदार जखमी झाले. पोलिसांनी त्याच्याकडून गांजा जप्त केला.
गांजा तस्कराचे नाव मुख्तार उर्फ मुस्तफा खान मंजूर खान (29, रा. विलायततुला, अचलपूर) असे आहे. मुख्तार गांजा घेऊन चांदूर बाजारकडून अचलपूर मार्गाने येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार व त्यांचे पथक या मार्गावर मुख्तारच्या मागावर होते. मुख्तार दुचाकीने आल्यावर, पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ दोन किलो गांजा असल्याचे आढळून आले. पोलिस पकडणार हे मुख्तारच्या लक्षात येताच त्याने कमरेचा चाकू काढून पोलिस पथकावर हल्ला चढवला. पथकातील पोलिस जमादार स्वप्निल तंवर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तंवर यांना चाकू मारला. तंवर यांच्या हाताला चाकू लागून ते जखमी झाले. पथकातील अन्य पोलिसांनी मुख्तारला ताब्यात घेतले.
पोलिसांनी मुख्तारकडून दोन किलो गांजा, एक दुचाकी असा एकुण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी अचलपूर पोलिसांत तक्रार दिल्यावरून, पोलिसांनी मुख्तार उर्फ मुस्तफा खान मंजूर खान याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यासह शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.