Home » राज्यातील गणेश मंडळांना आता पाच वर्षातून एकदाच घ्यावी लागेल परवानगी

राज्यातील गणेश मंडळांना आता पाच वर्षातून एकदाच घ्यावी लागेल परवानगी

by नवस्वराज
0 comment

पुणे : राज्यातील गणेश मंडळांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या आता पाच वर्षातून एकदाच घ्याव्या लागणार आहे. पुणे येथील एका बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. ही सवलत यावर्षीपासूनच राज्यातील सर्व गणेश मंडळांना देण्यात येणार आहे.

पुणे, मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील गणेशोत्सवालाही मोठी परंपरा आहे. अकोला, अमरावती, खामगाव, नागपूर, यवतमाळ, वर्धा येथे भव्य प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व ठिकाणच्या गणेश मंडळांना दरवर्षी विविध प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात. पोलिस विभाग, नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, विद्युत विभाग, धर्मदाय आयुक्त आदी विभागांच्या कार्यालयाचे उंबरठे गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांना झिजवावे लागत होते. कालांतराने अनेक ठिकाणी ‘एक खिडकी योजना’ आणण्यात आली, तरीही मंडळांना दरवर्षी नव्याने परवानगी घ्यावीच लागते. आता दरवर्षी नव्याने परवानगी घेण्याची गरज भासणार नाही व सर्व परवानगी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच ठिकाणी मिळतील, असे शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील महापालिकांकडून आकारले जाणारे मंडप शुल्क माफ करण्यात आले आहे. मंडप शुल्क माफ करणे आणि वीजमीटर परवानगीसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकऱ्यांनी गणेश मंडळांना सहकार्य करावे, असे शिंदे यांनी सांगितले. पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजविण्याला परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे ते म्हणाले. गणेश विसर्जन मिरवणुकीत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेनंतरही मंडळांना पारंपारिक वाद्ये वाजवू द्यावीत, पोलिसांनी कारवाई करू नये, असे आदेश त्यांनी दिलेत. उत्सवादरम्यान नागरीकांना त्रास होणार नाही, याची काळजी पोलिस आणि प्रशासनाने घ्यावी. वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी, असेही आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!