Home » छत्रपतींच्या आदर्शाने पिढी घडावी : गडकरी

छत्रपतींच्या आदर्शाने पिढी घडावी : गडकरी

by नवस्वराज
0 comment

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे. ज्ञानाच्या मंदिरात आरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श, सिद्धांत व नीती आदी ज्ञानाने परिपूर्ण पिढी तयार होईल, असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराज बाग स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ ५१ फूट उंच असा भव्य पुतळा उभारणीचा भूमिपूजन समारंभ रविवार, दिनांक १८ जून २०२३ रोजी सकाळी पार पडला. त्यानंतर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात गडकरी मार्गदर्शन करीत होते.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत प्रिन्स शिवाजी राजे भोसले (तंजावर), माजी मंत्री अनिल देशमुख, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी आमदार जोगेंद्र कवाडे, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, प्रा. डॉ. बबनराव तायवाडे, शेखर सावरबांधे, मंगेश डुके यावेळी उपस्थित होते.

स्मारक समितीचे सचिव मंगेश डुके यांच्या हस्ते सहपत्नीक पुतळा स्थळावर विधिवत होमहवन व पूजन पार पडले. त्यानंतर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गडकरी, आमदार अभिजीत वंजारी, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, प्रशांत पवार आदींनी उपस्थिती नोंदविली. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श शासक असे विविध  व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यांच्या कार्यातून दिसतात. छत्रपतींच्या विचारांच्या अनुरूप भविष्यातील पिढी घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अभिनेता रजनीकांत यांच्या चेन्नई येथील घरी गेले असता छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो दर्शनी भागात असल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.

यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना पुतळ्या विषयी माहिती दिली. फक्त पुतळाच ३२ फुटाचा असून चबुतरा, छत्र असा एकूण ५१ फुटाचा भव्य पुतळा उभारल्या जात असल्याचे ते म्हणाले. याच ठिकाणी संग्रहालय तसेच ग्रंथालय उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव मंगेश डुके यांनी केले. यावेळी बोलताना शिवाजी राजे भोसले म्हणाले की, इंग्रज आले नसते तर भारतावर मराठ्यांचे राज्य असते. रयतेला लेकरांप्रमाणे वागविणारे छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते असे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!