अकोला : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एस. के. सावजी नामक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत लाखों रुपयांचा माल खाक झाला. शुक्रवार, २ जून २०२३ रोजी ही घटना घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे गोदाम गेल्या अनेक दिवसांपासून बंद होते.
शुक्रवारी सकाळी गोदामातून अचानक धुर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. त्यानंतर लोकांनी याबाबत अग्निशमन दल आणि पोलिसांना कळविले. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या या गोदामात डिटर्जंट आणि अॅसिडचा साठा होता. त्यामुळे आग अधिकच भडकली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी आणि अकोला अग्निशमन दलाच्या बंबांनी एमआयडीसी परिसत गाठत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनीही या कामी अग्निमशमन दलास मदत केली. गोदामाचे शटर तोडत आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले.
पोलिस आणि अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार गोदामात व्हॉईट कॅट कंपनीचे डिटर्जंट आणि अॅसिड ठेवण्यात आले होते. अॅसिडमधील रसायनामुळे आग अधिक भडकल्याचे सांगण्यात येत आहे. अॅसिड आणि डिटर्जंटच्या रसायनामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनीही मास्क लावत आग विझविली. तोपर्यंत गोदामातील संपूर्ण माल खाक झाला होता. श्याम सावजी यांच्या मालकीचे हे गोदाम असून आगीमुळे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.