अकोला : शहरातील मध्यभागी असलेल्या एका प्रिंटिंग प्रेसला लागलेल्या आगीमुळे काही काळ खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळी घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळविले. दुपारी बारा ते एक वाजतादरम्यान हा प्रकार घडला. याच दरम्यान अकोल्यात श्री संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा सुरू होता. त्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुरड गल्ली येथील जनता बँक समोरील गिरीराज प्रिंटिंग प्रेसला रविवार, २८ मे २०२३ रोजी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाचे जवान आगीच्या ठिकाणी दाखल झालेत. मोठी कसरत करत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोवर प्रिंटिंग प्रेसचे मोठे नुकसान झाले होते. आगीमुळे येथे ठेवण्यात आलेला कागद पूर्णपणे जळुन खाक झाला. घटनेमुळे नेमके किती नुकसान झाले, हे कळु शकले नाही.