Nagpur : लडाखमधील जनतेच्या समर्थनार्थ नागपूरच्या स्वयंसेवी, नागरिकांनी रविवारी (ता. 17) संविधान चौकात जोरदार निदर्शने केली. नागरिकांनी ‘हवामान संप’ पुकारला. डॉ. सोनम वांगचूक आणि लडाखचे लोक संविधानातील सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीची मागणी करीत आहेत. या अनुसूचीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्वायत्तता आणि अधिकार देऊन लडाखचा नैसर्गिक वारसा जतन करण्यात मदत होईल.
सध्या खाणकाम, जलद औद्याोगिकीकरणाचा लडाखच नव्हे तर संपूर्ण भारतावर विनाशकारी परिणाम होईल, असे थ्री इडियट हा चित्रपट ज्यांच्यावर तयार झाला त्या डॉ. सोनम वांगचूक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे डॉ. सोनम वांगचूक शून्याखालील तापमानात 21 दिवसांचे उपोषण करीत आहे. वांगचूक यांच्या आवाहनानुसार त्यांचे लाखो शुभचिंतक, अनुयायी तसेच पर्यावरण आणि निसर्गप्रेमींनी 17 मार्चला देशव्यापी हवामान संप किंवा उपोषणाचे आवाहन केले होते. त्यानुसार नागपुरातील निसर्गप्रेमी नागरिक व संघटनांनी रविवारी हवामान संप पुकारला. पर्यावरण रक्षणाचे फलक हाती घेत नागरिकांनी नागपुरातील संविधान चौकात धरणे दिले. लोकशाही आणि शांततापूर्ण पद्धतीने हा संप करण्यात आला. डॉ. वांगचूक यांच्या या आंदोलनाला सध्या देशभरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे.
सोनम वांगचूक आहेत कोण?
सोनम वांगचूक (जन्म : 1 सप्टेंबर 1966) हे लडाखमधील अभियंता आणि शिक्षण सुधारक आहेत. सौर उर्जेवर चालणाऱ्या एसईसीएमओएल कॅम्पसची रचना करण्यासाठी ते ओळखले जातात. वांगचूक स्वयंपाकासाठी, प्रकाशासाठी किंवा उष्मेसाठी कोणतेही जीवाश्म इंधन वापरत नाहीत. वांगचूक यांना 2016 मध्ये रोलेक्स ॲवॉर्ड फॉर इंटरप्राइज हि लॉसएंजलस येथे प्रदान करण्यात आला. जागतिकस्तरावर प्रतिष्ठेचा हा पुरस्कार यापूर्वी जगातील फक्त 140 व्यक्तींना मिळाला आहे. वांगचूक यांनी बर्फ स्टुपा तंत्रज्ञानाचा शोध लावला. वांगचूक यांच्या जीवनावर आधारीत ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट तयार करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते.
उपोषण कशासाठी?
सोनम वांगचूक यांनी यूट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी विकासाच्या नावाखाली लडाखच्या पर्यावरणाशी खेळ केला जात असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लडाखबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. वांगचूक म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना लडाख आणि इतर हिमालयीन प्रदेशांना औद्योगिक शोषणापासून वाचविण्याची विनंती करतो, कारण त्याचा लडाखच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. याशिवाय देशाचा संपूर्ण पर्यावरणीय समतोल बिघडेल.