– हेमंत जकाते
मंदिरात दर्शनाला येतांना हिंदू संस्कृतीला अनुसरून पोशाख घालावा, शरीर प्रदर्शन करणारे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समिती तसेच हिंदूत्ववादी संघटनांतर्फे अनेक मंदिरात बॅनर्स लाऊन करण्यात येत आहे. यामुळे तथाकथित बुध्दीवादी, सुधारणावादी मंडळी नाराज झाली आहेत, असे आवाहन करणे योग्य नाही असे त्यांचे मत आहे.
मंदिर म्हणजे हॉटेल, पर्यटन स्थळ किंवा मौजमजा करण्याचे ठिकाण नाही. मंदिर हे एक पवित्र आणि आस्थेचे स्थान आहे. देवदर्शनाने चित्त एकाग्र होऊन मनःशांती ची अनुभूती होते. अशा ठिकाणी येतांना पुरूष असो किंवा स्त्री पोषाख शालीन आणि संस्कृतीला अनुसरूनच असावा. मंदिर म्हणजे फॅन्सी ड्रेस किंवा सौंदर्य स्पर्धेचा मंच नाही. मंदिर प्रवेशासाठी कायद्यान्वये कुठलीही वस्त्रसंहिता नसली तरी अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजक, अशोभनीय वस्त्र परिधान करणे निश्चितच अपेक्षित नाही.
भोगवाद आणी चंगळवादाच्या नादी लागल्यामुळे आपल्याला हिंदू धर्म आणि संस्कृतीचा विसर पडला आहे. पाश्चात्य संस्कृती आणि विचारसरणीचे अंधानुकरण करतो आहे. अंगप्रदर्शन हि एकप्रकारची विकृती आहे. मंदिर व्यवस्थापन आणि हिंदूत्ववादी संघटनांना असे आवाहन करण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते.