अमरावती : राणा दाम्पत्य आणि बच्चू कडु यांच्यातील कडवटपणा कमी होताना दिसत नाही. आता अमरावती लोकसभा मतदार संघावर दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीने दावा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या नव्या वादामुळे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि बच्चू कडु यांच्यामध्ये नवी ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आमदार बच्चू कडू अमरावतीमधुन मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. त्याच प्रमाणे आमदार रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समर्थक असल्याने त्यांनाही मंत्रीपदाची आशा होती. अशात वाद निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्य नीतीचा खेळ खेळत आमदार बच्चू कडु यांना दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष केले. या अध्यक्षपदाला त्यांनी मंत्रीपदाचा दर्जाही दिला. त्यामुळे अमरावतीमधुन रवी राणा यांचा मार्ग मोकळा झाला. मात्र अशात बच्चु कडू यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे.
प्रहारचे संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागा प्रहारला मिळावी, अशी मागणी केली आहे. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी बच्चू कडुंना उत्तर दिले आहे. आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘आम्ही निवडणुकीच्या तयारीत आहोत. आमची याबाबत एक बैठक झाली. १५ ते २० जागा विधान सभेच्या आणि एक जागा लोकसभेची लढवणार आहोत. निवडणुकींना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. युतीमध्ये घटक पक्ष म्हणून कसे पुढे जाता येईल, याची चाचपणी करत आहोत. पण युतीत ताळमेळ न जमल्यास आम्ही निवडणुकींना वेगळे सामोरे जावू.’
‘अमरावती लोकसभेवरती आमचा दावा आहे. या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वी मी इथे निवडणूक लढविली आहे. अपक्ष लढवून पाच हजार मते मिळवली होती. ही जागा आरक्षित आहे आणि आमच्याकडेही ताकदीचा उमेदवार आहे. कुणाशीही लढत झाली तरी आमचा उमेदवार ताकदीचा आहे. युतीमध्ये ही जागा आम्हाला मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे’, असे बच्चू कडु यांनी स्पष्ष्ट केले.
अमरावती लोकसभा मतदार संघावर कडु यांनी दावा करताच त्याला युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणा म्हणाले, ‘एनडीएचे खासदार म्हणून नवनीत राणांच्या नावाची चर्चा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना मी मध्यंतरी भेटलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. त्यामुळे कोण कुठली जागा मागतोय, याने काही फरक पडत नाही. याचा अंतिम निर्णय मोदी आणि फडणवीस घेतील. कुणी कितीही दावे केले, ते दावे खोडून काढण्याची ताकद रवी राणामध्ये आहे.’ आपण एनडीएसोबत असून एनडीएनेही आपल्याला पूर्ण पाठिंबा दिल्याचा दावा राणा यांनी केला आहे.