Administration : जुन्या शहरातील डाबकी रोड हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. वाढत्या रहदारीमुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. अकोला पश्चिमचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे स्थानिक विकास निधीतून रस्ता रुंदीकरणाचे काम होणार आहे. विकसित आराखड्यानुसार 18 मीटर रूंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे तीन मीटर रुंदीकरण करणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूला तीन मीटर रुंदीकरणाचे काम, भूमिगत इलेक्ट्रिक वाहिन्या टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यानुसार कामाचा आदेश काढण्यात आल्याचे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे म्हणणे आहे. परंतु अतिक्रमण काढताना बऱ्याच ठिकाणी प्लॉट, दुकान तसेच घर असणाऱ्यांच्या मालकीच्या जागेची आखणी चुकीची केल्यामुळे नागरीकात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
डाबकी रोड येथील व्यापारी संघ व नागरीकांच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांची मंगळवारी (ता. 20) भेट घेवून त्यांना समस्यांबाबत अवगत केले. उपायुक्त गीता ठाकरे यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेत, अतिक्रमण विभाग, पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांना बोलावून व्यापारी संघाच्या शंकांचे निरसन केले. प्रस्तावित असलेल्या दोन्ही बाजुचे तीन मीटरवर असलेले अतिक्रमण नागरिकांनी स्वतः काढून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले.
उपायुक्तांनी नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला दिले. प्रस्तावित रस्त्याच्या खालून अमृत योजनेची मुख्य वाहिनी जाते. त्याचे खाली पाणीपुरवठा करणारी जुनी बिडाची जलवाहिनी आहे. वाहिनीमधून नागरीकांना नळजोडण्या (कनेक्शन) दिलेल्या आहेत. त्या योग्य करण्याबाबत सांगितले. रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना उपायुक्त गीता ठाकरे यांनी यावेळी दिले.
डाबकी रोड व्यापारी संघाचे तसेच नागरीकांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अशोक ओळंबे, अतुल पवनीकर, माजी नगरसेवक शशी चोपडे, माजी नगरसेवक विलास गोतमारे, अतुल येळणे, योगेश ढोरे, अॅड. सचिन बाळापुरे, श्याम पोद्दार, प्रा. शिवकुमार चौबे, अनंत लोटे, दीपक महल्ले, दीपक कुंडवाल, किशोर वाघ यांनी महानगरपालिका उपायुक्त गिता ठाकरे, पाणीपुरवठा तसेच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.