Akola : भाजपने उमेदवार जाहीर केलेल्या सर्वच मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास त्या समजून दूर करण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघात एकदा निर्णय झाल्यानंतर महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वांना एकजुटीने काम करावे लागेल. काही नाराजी असल्यास ती चर्चा करून दूर करीत आहोत. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष कार्यरत राहतील, असा विश्वास भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, अमरावतीची जागा भाजपच लढणार आहे. जो उमेदवार असेल तो कमळ या निवडणूक चिन्हावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले की, ‘भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि मी दौरा करीत आहोत. सर्व मतदारसंघामध्ये आम्ही जाणार आहोत. प्रचार सुरू होण्यापूर्वी नीट व्यवस्था लावून नियोजन केले जात आहे. काही अडचणी असतील तर त्या समजून दूर केल्या जातील. अकोल्यात तयारी चांगली आहे. बुथपर्यंत सगळी रचना लावली आहे. ही निवडणूक बुथमध्ये लढली पाहिजे, असे पक्षाचे निर्देश आहेत. त्यामुळे चांगला निर्णय येईल.
अमरावतीत वादाचे काय?
अमरावतीची जागा भाजप लढेल. जो उमेदवार असेल तो पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढेल. नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. त्या पाच वर्ष भाजपसोबत राहिल्या आहेत. लोकसभेतही त्यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची बाजू मांडली. मात्र, उमेदवारी देण्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ व निवड समिती घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. हर्षवर्धन पाटील यांचे काही प्रश्न होते. ते सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. काही सोडवले देखील आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाप्रति समर्पित भावनेने कार्यरत आहेत. पूर्णक्षमतेने ते पक्षाचे काम करतील, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यक्त केला.