Home » उद्धव ठाकरेंनी शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी : देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंनी शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी : देवेंद्र फडणवीस

by नवस्वराज
0 comment

अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करुन टिप्पणी करणे अतिशय खालच्या दर्जाचे असल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपले शब्द परत घेतले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचे पटत नाही, पण काही पथ्य पाळली पाहिजेत. नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे असे बोलणे अयोग्य आहे. दीड वर्षांचा बच्चू आहे, रुद्रांश. त्याचा जन्म झाला आणि तुमचे अध:पतन सुरू झाले. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करूनही उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेण्याची मागणी केली आहे. अकोल्यासह सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री झाल्यानंतर फडणवीस प्रथमच अकोल्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केलेले भाषण ही भाजपाची स्क्रीप्ट होती, असा आरोप धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याला अकोल्यात उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरांच्या भाषणाची स्क्रीप्ट कोण लिहते, हे आधी पाहा अशा शब्दांत टोला लगावला आहे.

आदिपुरुष चित्रपट येतोय एवढच मला माहीत आहे. त्यामध्ये काय आहे मला माहीत नाही. राम कदमांनी का विरोध केला. मनसेने का पाठींबा दिला याची माहिती मला नाही मला आधी आदिपुरूष बाबत माहिती घेऊन द्या मगच बोलता येईल नाहीतर माझाच आदिमानव व्हायचा अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. अकोला दौऱ्यादरम्यान फडणवीस यांच्या हस्ते सिंधी कॅम्प परिसरातील अकोला पोलीस दलाच्या नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे ७ ऑक्टोबर रोजी ११.३० वाजता लोकार्पण करण्यात आले.

आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी महापौर अर्चना मसने, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक रितु खोकर, आर्कीटेक्ट सोहेल खान आदी यावेळी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!