Home » RSS Meeting : दत्तात्रेय होसबळे पुन्हा संघाचे सरकार्यवाह

RSS Meeting : दत्तात्रेय होसबळे पुन्हा संघाचे सरकार्यवाह

Mohan Bhagwat : नागपूर येथील प्रतिनिधी सभेत झाली घोषणा

0 comment

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील स्मृती मंदिर परिसरात अखिल भारतीय वार्षिक प्रतिनिधी सभा सुरू आहे. सभेमध्ये पहिल्या दिवशी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. राम मंदिर प्रस्तावावरही सभेत चर्चा करण्यात आली. नागपुरात दर तीन वर्षांनी होणाऱ्या वार्षिक प्रतिनिधी सभेला विशेष महत्त्व आहे. या सभेत सरसंघचालकानंतर दुसरे महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह या पदाची निवड केली जाते. त्यामुळे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची फेरनिवड होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.

सरकार्यवाह पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची फेरनिवड करण्यात आली. संघाच्या प्रतिनिधी सभेमध्ये सरकार्यवाह या पदाची निवड ही निवडणूक पद्धतीने केली जाते. मात्र यासाठी सामान्य निवडणुकीसारखी प्रक्रिया राबवली जात नाही. सभेत प्रमुख व्यक्ती एखाद्याच्या नावाची सूचना करतो, त्यानंतर त्या नावाला समर्थन आणि अनुमोदन दिले जाते. दत्तात्रेय होसबळे यांची फेरनिवड तीन वर्षांसाठी झाली आहे. त्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी होसबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 15 ते 17 मार्च दरम्यान नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात पार पडली. राम मंदिर संदर्भातील पुढील योजना, संघाचे शताब्दी वर्ष, शाखांचा विस्तार अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह पदाची निवडणूक हे या बैठकीचे वैशिष्ट्य होते. 99 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समाजिक कार्य सुरू आहे. 2025 मधील विजयादशमीला संघाला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला संघाच्या 32 संघटनांचे प्रमुख, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपचे अध्यक्ष, संघटनमंत्री असे देशभरातून 1 हजार 529 कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!