Home » Amravati : स्वागत कमानीच्या वादावरून पांढरी खानमपूरमध्‍ये संचारबंदी

Amravati : स्वागत कमानीच्या वादावरून पांढरी खानमपूरमध्‍ये संचारबंदी

Anjangaon Surji : तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांची कारवाई

by नवस्वराज
0 comment

Anjangaon Surji (Amravati) : अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे एका स्वागत प्रवेश द्वाराला महापुरुषाचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला. गावातील एका गटाने विरोध दर्शविल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी गावातील दीडशे ते दोनशे ग्रामस्‍थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. या विषयावर जिल्‍हा प्रशासनाचे अधिकारी आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. गावातील एकूण परिस्थिती लक्षात घेता, मंगळवारी रात्रीपासूनच गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पांढरी खानमपूर येथील स्‍वागत कमानीचा जुना वाद आहे. तेथील ग्रामपंचायतीने 26 जानेवारी 2020 रोजी गावामध्ये प्रवेशद्वार उभारुन त्याला नाव देण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला होता. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नव्हते. 26 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा प्रवेशद्वाराबाबत कोणीही आक्षेप घेणार नाही, असा ठराव पारीत केला. गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेश द्वाराचे बांधकाम करण्‍यासाठी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय राज्य महामार्ग विभाग, यांच्याकडून 22 फेब्रुवारी 2024 रोजी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतरही गावातील एका गटाने या प्रवेशद्वाराच्या बांधकामाला विरोध दर्शविला आहे.

प्रवेश द्वाराच्या बांधकामाला विरोध दर्शवित एका समाजावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे गावातील काही लोकांनी आपली फिर्याद मांडण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पांढरी खानमपूर येथे सामाजिक सलोखा कायम रहावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावामध्ये 8 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गावातील पोलिस बंदोबस्त वाढविण्‍यात आला आहे. मुंबई येथील मंत्रालयात जाण्यापूर्वी पांढरी खानमपूर येथील ग्रामस्थ अमरावती विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!