Bhandara Gondiya Constituency : भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातातून नाना थोडक्यात बचावले. नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी गेले होते.
प्रचार दौरा आटोपून रात्रीच्या सुमारास नाना पटोले सुकळी येथे जायला निघाले होते. भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नाना पटोले यांच्या गाडीचा मागचा भाग अक्षरशः चकनाचूर झाला. मात्र नानांना व गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली. भंडारा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. नाना पटोले यांच्या वाहनाला झालेला अपघात हा अपघात नसून राजकीय घातपाताची शक्यता असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत.