Congress Vs BJP : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आपल्या अकोला दौऱ्यात आजारी असलेल्या भाजप खासदार संजय धोत्रे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर आहेत, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील’, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर नाना पटोले यांनी सारवासारव करीत संजय धोत्रे हे माझे मित्र असल्याचे सांगितले.
काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अकोल्यात नाना पटोले आले असता त्यांनी हे वक्तव्य केले. पटोले म्हणाले, 2014 ते 2017 पर्यंत आपण खासदार होतो. त्याकाळात नोटबंदी आणि जीएसटी आली. त्यावेळेस आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध केला. त्यावेळी अकोल्याचे खासदार देखील होते. ते आता व्हेंटिलेटरवर आहेत. व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटरवर काढतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक धोरण बदलविले जात आहे, अशी टीका पटोले यांनी केली. त्यानंतर नाना पटोले यांनी संजय धोत्रे हे आपले चांगले मित्र असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणूक जवळ आल्याने काँग्रेस डॉ. अभय पाटलांची उमेदवारी मागे घेणार आहेत, अशी हवा अकोल्यात उडविण्यात आली आहे. यात कोणतेही तथ्य नसल्याचे पटोले यांनी नमूद केले. दरम्यान पटोले यांनी संजय धोत्रे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता भाजप त्यांच्यावर चांगलीच संतापली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनाबाहेर असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल पटोले असे विधान करूच कसे शकतात असा संताप भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मतदारांना सगळे काही कळते. त्यामुळे पेटोले यांनी असे विधान करायला नको होते, अशी प्रतिक्रिया अकोल्यातील सामान्य नागरिकांनीही व्यक्त केली आहे.