Home » Lok Sabha Election : अकोल्यातील खरे दंगलखोर पुढे आले पाहिजे

Lok Sabha Election : अकोल्यातील खरे दंगलखोर पुढे आले पाहिजे

Nana Patole : भाजपच्या आरोपांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पलटवार

by admin
0 comment

Congress Vs BJP : अकोल्यात दंगल भडकवणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली असा आरोप होत आहे. मात्र खरे दंगल भडकवणारे कोण होते हेही समोर आले पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये तालिब शहाला भाजपचा नेता केले आहे. अशा अनेक गुन्हेगारांना भाजपने पक्षात सामावून घेतले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर होणारे आरोप पूर्णपणे चुकीचे आहे, असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे साजीद खान पठाण यांना उमदेवारी दिली आहे. खान हे दंगलखोर आहेत. एकाचा बळी घेणाऱ्या अकोल्यातील दंगलीतील मुख्य आरोपी साजीद खान आहेत. त्यामुळे काँग्रेस जातीय दंगल घडविणाऱ्याला कशी काय उमेदवारी देऊ शकते, असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. दरेकर यांच्या या आरोपांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पटोले म्हणाले, अकोल्यातील दंगल कोणी घडविली त्या खऱ्या गुन्हेगारांची नावे पुढे यायला हवी. भाजपच्याही अनेक नेत्यांची नावे दंगलखोरांच्या यादीत आहेत. काही जणांवर खटले सुरू आहेत. काहींनी हे खटले मॅनेज करून निर्दोष मुक्तता करून घेतली आहे. खरा दंगलखोर कोण असतो, खरा गुन्हेगार कोण असतो हे जनतेला ठाऊक असते. त्यामुळे भाजपने उगाच आपण फारच चारित्र्यवान असल्याचा आव आणू नये, असा टोला आमदार नाना पटोले यांनी लगावला. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये केवळ अडीच हजार मतांचा फरक होता. त्यामुळे जनाधार कोणाला होता, लोकनेता कोण आहे हे लक्षात घेवूनच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याचे पटोले म्हणाले. भाजपला केवळ जातीयवाद करून मतदान मिळवायचे आहे. भाजपचे अनेक खासदारच सांगतात की संविधान बदलण्यासाठी लोकसभेच्या 400 जागा पाहिजे. पण असे होणार नाही. भाजपा 400 पार नाही तर 420 आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

मतदारांनाच मागणार 50 रुपये

काँग्रेसचे बँक खाते गोठविल्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायलाही पक्षाजवळ पैसाच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात झालेली ही आर्थिक नाकाबंदी लक्षात घेता आता काँग्रेसने मतदारांकडून उमेदवारांच्या खर्चासाठी 50 ते 100 रुपये प्रत्येकी मागण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नागपुरात काँग्रेसचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातील खुर्च्यांवरही काँग्रेसने देणगी गोळा करण्यासाठी ‘क्युआर कोड’ लावला होता. आता प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराच्या बँक खात्याचा तपशिल जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी हे स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!