Congress Vs BJP : निवडणूक प्रचारासाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेसने नागपूर भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपचे उमदेवार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कारवाईची मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानंतरही नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसच्या तक्रारीत आहे. 01 एप्रिल 2024 रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 ते 01 या वेळादरम्यान वैशालीनगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांचा राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल प्राचार्यांनाही निलंबित करावे. राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2014 मध्ये दिलेल्या आदेशाचेही ते उल्लंघन आहे, असे काँग्रेसचे तक्रारीत म्हटले आहे.
‘मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही. बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका’, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर गडकरी यांना नागपूरच्या गल्लीबोळात फिरावे लागत आहे, असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला आहे. नागपुरात गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदास विकास ठाकरे मैदानात उतरले आहेत. मात्र प्रचारात सध्या भाजप आघाडीवर आहे. शहरातून निघणाऱ्या रॅलींमध्ये नितीन गडकरी यांना व्यापक प्रतिसाद मिळत आहे.