Akola : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालीय. बुधवारी पहिला पेपर झाला. गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथके, बैठी पथके याशिवाय पोलिसांचा फौजफाटाही तैनात केला आहे. तरीही बारावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी वेगळी शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ चक्क पोलिस बनून परीक्षा केंद्रावर पोहोचला.
काय घडले नेमके?
बहिणीसाठी भाऊ काहीपण करायला तयार असतो. याचा प्रत्यय या प्रकरणातून येईल. भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून परीक्षा केंद्रावर रूबाबात आपल्या बहिणीला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे हे बिंग फुटले आणि सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (वय 24, रा. पांगरा बंदी) असे या तोतया पोलिसांचे नाव आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये ही घटना घडली. आरोपी अनुपम याच्या बहिणीची परीक्षा या हायस्कूलमध्ये होती. 21 फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पेपर होता. बहिणीचा इंग्रजी विषय कच्चा असल्याने भावाने शक्कल लढवली. अनुपमने बहिणीला कॉपी देण्यासाठी पोलिसाचा गणवेश परीधान करून परीक्षा केंद्रावर पोहोचला. त्याचवेळी पातूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक किशोर शेळके हे ताफ्यासह परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहोचले. तेव्हा अनुपम देखील तिथेच उपस्थित होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच अनुपमने ‘सॅल्युट’ मारला. ‘सॅल्युट’ मारताच पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अनुपमने परीधान केलेला पोलिस गणवेश आणि त्यावर असणारी ‘नेमप्लेट’ चुकीची असल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याची चौकशी करत तपासणी केली असता त्याच्याकडे इंग्रजीच्या विषयाच्या कॉपी सापडल्या. यानंतर पोलिसांनी अनुपम खंडारे याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.