BJP Vs Congress : अकोल्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण जातीय दंगलीत एकाच मृत्यू झाला होता. या जातीय दंगलीतील मुख्य आरोपी असलेल्या साजिद खान पठाण यांना अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देत काँग्रेसने ‘काँग्रेस का हाथ, दंगाईयों के साथ’ असल्याचेच सिद्ध केल्याची सडकून टीका भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दरेकर बोलत होते. दंगल घडविणे, घातक शस्त्रांचा वापर करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या साजिद खान पठाण याला काँग्रेस कशी काय उमेदवारी देऊ शकते असा प्रश्नही दरेकर यांनी व्यक्त केला.
अकोला पश्चिम विधानभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम मतदारांचे प्राबल्य आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गोवर्धन शर्मा यांनी साजिद खान यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने एका दंगलखोराला संधी दिल्याचा थेट आरोप आमदार दरेकर यांनी केला. दरेकर म्हणाले, राहुल गांधी गाजावाजा करीत भारत जोडो यात्रा काढतात. या यात्रेच्या माध्यमातून कधीही न तुटलेला भारत जोडण्याचे नाटक ते करतात आणि इकडे अकोल्यात जातीवाद, दंगल करणाऱ्या साजिद खानला उमेदवारी देतात. यावरूनच काँग्रस किती दुटप्पी आहे. त्यांना जातीवाद कसा करायचा आहे हे सिद्ध होते.
गुन्ह्यांचा वाचला पाढा
साजिद खान पठाण यांच्या विरुद्ध अकोला शहरातील रामदास पेठ, कोतवाली आणि खदान या तीन पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. यावेळी दरेकर यांनी खान यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या 16 गुन्ह्यांची यादीच वाचून दाखवली. तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला खरे तर पक्षातून हाकलायला पाहिजे. परंतु साजिद खान पठाण यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ‘गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा’ असे धोरण अवलंबिल्याचे दिसत असल्याचे दरेकर म्हणाले. अकोल्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीतील साजिद खान पठाण मुख्य आरोपी आहेत. अशा गुन्हेगाराला दिलेल्या उमेदवारीचा भारतीय जनता पार्टी कडवा विरोध करत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालत काँग्रेस गुन्हेगारांचे उदात्तीकरण करीत आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली. काँग्रेस दंगलखोरांची उमेदवारी मागे घेणार का? असा सवालही आमदार दरेकर यांनी उपस्थित केला. अशा अट्टल गुन्हेगाराला उमेदवार म्हणून माथी मारत सर्वसामान्य जनतेवर काँग्रेस अन्याय करीत आहे. अट्टल गुन्हेगारांना मतदार त्यांची खरी जागा आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत दाखवून देतील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.