Akola : बोगस वकिलांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची अचूक माहिती मिळण्यासाठी यापुढे वकिलांची सनद पडताळणी होणार आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून (BCI) यासंदर्भातील सूचना प्राप्त झाल्यानंतर 31 मार्च सनद पडताळणी होणार होती. मात्र आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. आता वकिलांना 30 एप्रिलपर्यंत सनद पडताळणी करून घेता येणार आहे.
महाराष्ट्रात दीड लाखांवर वकिलांची नोंदणी राज्य बार कौन्सिलकडे आहे. परंतु त्यापैकी अर्धे वकील प्रत्यक्षात वकिली करत आहेत. यातील अनेक वकिलांचे निधन झाले आहे. काहींनी खासगी कंपन्यांमध्ये नोकरी पत्करली आहे. एकदा सनद घेतली की, त्याचे नूतनीकरण करण्याची पद्धत यापूर्वी नव्हती. खासगी नोकरी करणारे वकिलही प्रॅक्टिस सोडल्याचे राज्य बार कौन्सिलला कळवित नव्हते. त्यामुळे प्रत्यक्षात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची संख्या कमी असतानाही सर्व राज्यांमध्ये वकिलांचा आकडा फुगत चालला होता. कार्यरत वकिलांची नेमकी माहिती बार कौन्सिलकडे नसल्याने वकिलांना द्यावयाच्या सुविधेमध्येही अडचणी येत होत्या. एखाद्या वकिलाबाबत तक्रार आल्यास त्याचा पत्ता बदललेला असल्याने अनेक अडचणी येत होत्या.
नूतनीकरण गरजेचे
वकिलांना आता दर पाच वर्षांनी सनदेचे नूतनीकरण करून घ्यावे लागेल. त्यामुळे प्रत्यक्षात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची अचूक माहिती कळेल. बोगस वकिलांवर कारवाई करता येईल व वकिलांना अनेक सोयी-सुविधाही देता येणार आहेत. यावर्षी वकिलांच्या सनद पडताळणीसाठी 31 मार्च ही तारीख देण्यात आली होती. मात्र अनेक वकिलांना कागदपत्रे सादर करण्यात वेळ लागणार होता. नोटरीचाही निकाल नुकताच लागला. त्यामुळे ही तारीख वाढण्याची मागणी पुढे आली होती. अखेर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सनद पडताळणी प्रक्रियेची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविली आहे.