Bacchu Kadu : नवनीत राणा यांना बिल्कुल पाठिंबा देणार नसल्याची ठाम भूमिका प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून नवनीत राणा निवडणूक लढवू शकतात, परंतु अद्यापही त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र महायुतीत सहभागी असलेले प्रहार पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक नेत्यांनी हीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपपुढील पेच वाढला आहे.
बच्चू कडू यांच्यासह अनेक नेत्यांनी ही भूमिका घेतल्याने युतीसमोर अमरावती लोकसभा मतदारसंघात अंतर्गतच आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे. तीन दिवसांपूर्वी प्रहार पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत आ. बच्चू कडू यांनी अमरावतीत मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी लोकसभेबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. 11 एप्रिलला प्रहार आपली भूमिका जाहीर करेल, असेही त्यांनी सांगितले. आम्ही नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही. वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडू. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे आम्ही थोडे अडचणीत येत आहो, असे वाटत आहे. वास्तविक महायुतीतून बाहेर जायची आमची मनातून इच्छा नाही, मात्र त्यांना ठेवायचे नाही तर आम्ही कोणाचे गुलाम किंवा लाचार नाही, अशावेळी बाहेर पडू आणि वेळ आली तर प्रहारचा उमेदवार उभा करू, असेही आ. बच्चू कडू म्हणाले.