Bribe Case : अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एक सहाय्यक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector)लाचेच्या रकमेसह पळाला. शनिवारी (ता. 06) घडलेल्या या घटनेमुळे अकोल्याच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
राहुल देवकर असे पैशांसह पळून जाणाऱ्या एपीआयचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) सापळ्यात अडकूनही देवकर यांनी फिर्यादीकडून स्वीकारलेली लाचेची रक्कम आणि खासगी वाहन घेऊन पळ काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीच्या एका प्रकरणात तपास करीत असलेल्या देवकर यांनी आरोपीला ‘चार्जशीट’मध्ये आरोप कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. जास्त रक्कम मागितल्याने फिर्यादीने अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार केली होती. तक्रार प्राप्त झाल्यांनतर शनिवारी एसीबीने सापळा रचून देवकर यांना रंगेहात पकडले. पंचांसमक्ष एक लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीच्या कारवाईची शंका आल्याने देवकर यांनी लाल रंगाच्या ब्रिझा कारने पोलिस स्टेशनमधून पळ काढला. एसीबीचा छापा पडल्याचे व एपीआय पळून गेल्याचे कळल्यानंतर पोलिस ठाण्यात खळबळ उडाली.
मागितले दीड लाख
अवैध सावकारी प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात आरोपी महिलेला तत्काळ अटकपूर्व जामीन मिळावा आणि आरोपींच्या बाजूने चार्जशीट तयार करून तपास सोपा जावा, यासाठी एपीआय राहुल देवकर यांनी तब्बल दीड लाखाची मागणी केली होती. तडजोड करून लाचेची रक्कम 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत पोहोचली. लाचेची रक्कम देण्यासाठी संबंधित अकोट शहरात दाखल झालेत. देवकर यांनी लाच स्वीकारली खरी. परंतु एसीबीच्या कारवाईचा संशय देवकर यांना आला. त्यानंतर लागलीच देवकर यांनी लाचेची रक्कम घेत आपल्या खासगी चारचाकी वाहनाने पळ काढला.
सिनेस्टाइल पाठलाग
पोलिसांनीच पोलिसाचा पाठलाग केल्याचा सिनेस्टाइल प्रकारही यावेळी घडला. ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी राहुल देवकर यांचा दूरपर्यंत पाठलाग केला. परंतु देवकर हाती लागले नाहीत. त्यामुळे एसीबीने देवकर कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्यातच गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. अकोला आणि अमरावती एसीबीचे अधिकाऱ्यांनी आता एपीआय राहुल देवकर यांचचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे.