BjP News : भाजपचे अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनुप धोत्रे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांच्यावर कर्ज देखील आहे. विविध मार्गाने त्यांना उत्पन्न प्राप्त झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. अनुप हे आयुष्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणूक लढवित आहेत.
अनुप धोत्रे यांच्याकडे 02 कोटी 61 लाख 34 हजार 845 रुपये, पत्नीकडे 01 कोटी 99 लाख 07 हजार 429 रुपये, हिंदू अविभक्त कुटुंबाकडे 01 कोटी 27 लाख 72 हजार 388 रुपये, तीन मुलांच्या नावावर 25 लाख 58 हजार 300 रुपये अशी एकूण 06 कोटी 13 लाख 72 हजार 962 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. एकूण स्थावर मालमत्ता 04 कोटी 78 लाख 87 हजार रुपयांची आहे. यापैकी स्वत: अनुप धोत्रे यांच्या नावावर 04 कोटी 03 लाख 27 हजार रुपयांची मालमत्ता आहे.
खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांनी स्वसंपादित केलेली 02 कोटी 47 लाख 71 हजार रुपयांची मालमत्ता आहे. वारसाहक्काने 01 कोटी 55 लाख 56 हजार रुपयांची मालमत्ता मिळाली आहे. अनुप यांच्या पत्नीच्या नावावर 75 लाख 60 हजार रुपयांची मालमत्ता आहे. अनुप धोत्रे यांच्यावर 02 कोटी 35 लाख 25 हजार 169 रुपये, पत्नीच्या नावावर 62 लाख 30 हजार 816 व हिंदू अविभक्त कुटुंबावर 74 लाख 45 हजार 656 असे एकूण 03 कोटी 72 लाख 01 हजार 641 रुपयांचे कर्ज आहे.
कृषी, उद्योग व व्यवसाय अनुप यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. अनुप धोत्रे यांच्या नावावर दोन दुचाकी, एक ट्रॅक्टर, पत्नीच्या नावार कार व ट्रॅक्टर आहे. अनुप धोत्रे व त्यांच्या कुटुंबाकडे 815 ग्राम सोने आहे. 36 एकर 26 गुंठे, पत्नीच्या नावावर 10 एकर शेतजमीन आहे. त्यांच्याकडे शहरात विविध ठिकाणी प्लॉट असून पत्नीचे ग्वाल्हेर जिल्ह्यातही प्लॉट आहेत. अनुप धोत्रे यांच्यावर शहर कोतवाली पोलिस ठाण्यात पक्षाच्या आंदोलनादरम्यान कलम 37 अन्वये प्रतिबंधात्मक आदेशाचा गुन्हा दाखल आहे.