अकोला : हंडाभर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा ईलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील केळीवेळी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. यात शिवम भरतसिंग ठाकूर (वय २६) या तरुणाचा मृत्यू झाला.
अकोला जिल्ह्यातील केळीवेळी गावात गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने लोक दूरवरून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. शुक्रवार, २ जून २०२३ रोजी गावातील शिवम हंडाभर पाण्यासाठी गावातील पाण्याच्या टाकीजवळ गेला. पाण्याच्या टाक्यात पाईप सोडून मोटर मशीन सुरू केली. परंतु पाण्याचा उपसा करत असताना मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला अन् शिवमचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कबड्डीच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध असलेले केळीवेळी गाव अकोलापासून जवळच आहे. केळीवेळी गावाला तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. ग्राम मंडळाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून गावात पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी केळीवेळी गावातील एक नवीन भाग असलेला पांढरी येथे आहे. या ठिकाणी वारी येथून पाण्याचा साठा जमा होतो आणि तो गावच्या पाण्याच्या टाकीमध्ये साठवला जातो. परंतु सद्य:स्थितीत वेळेत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे गावकरी थेट पाण्याच्या टाक्यांवर पाणी आणण्यासाठी जात आहेत.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास शिवम भरतसिंग ठाकूर हा देखील हंडाभर पाण्यासाठी पांढरीमध्ये गेला होता. साठवणूक ठिकाणी पाणी खोलवर असल्यामुळे शिवमने सोबत आणलेली पाण्याची मोटर सुरू केली आणि पाईप पाण्याच्या टाकीत सोडला. मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि शॉर्टसर्किट होऊन शिवम ज्या ठिकाणी उभा होता, तिथे जोरदार विजेचा धक्का बसला. यात शिवमचा जागीच मृत्यू झाला. शिवमचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात दहीहंडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवम हा घरात एकटा मुलगा असून त्याच्या दोघेही बहिणींचे लग्न झाले आहे. शिवम याचा सेतूचा व्यवसाय आहे. या व्यावसायावर त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. परंतु शिवम अचानकपणे निघून गेल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्काच बसलाय. शिवमच्या आईला त्याच्या मृत्यूची बातमी समजताच तिने आक्रोश केला.