Seema Suraksha Dal : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्र सरकारकडून पाठविण्यात आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीसह अकोला पोलिसांनी शहराच्या विविध भागातून पथसंचलन केले. निवडणूक आणि रमजान महिना असल्याने केंद्र सरकारकडून अकोल्यात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. त्यानुसार सध्या अकोल्यात सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीला पाठविण्यात आले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यात शांतता कायम राहावी आणि निर्भय वातावरणात लोकसभा निवडणूक पार पडावी यासासाठी बीएसएफ कंपनी आणि दामिनी पथकासह सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पथसंचलन केले. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन करण्यात आले. खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास सर्वच भागात पथसंचलन (रूटमार्च) करण्यात आला. खदान, कौलखेड, रिंग रोड, मलकापूर, तुकाराम चौक, गोरक्षण रोडवरील, वैभव हॉटेल, महाकाली बार, नेहरू पार्क चौक अशा सुमारे नऊ किलोमीटच्या मार्गावर पोलिसांनी आधुनिक शस्त्रांसह शक्तीप्रदर्शन केले.
पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, बीएसएफचे कंपनी कमांडंट विकास चंद्रा, अकोला शहराचे पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी शंकर शेळके, शहर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील किनगे, शहर विभागातील सर्व पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे एकूण 34 अधिकारी, पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलिस निरीक्षक जुमनाके, राखीव पोलिस उपनिरीक्षक, बीएसएफचे 55 जवान, शीघ्र कृती दल, दंगल शहरातील एकूण 305 पोलिस कर्मचारी, साध्या वेशातील 10 पोलिस जवान, दामिनी पथकातील महिला कर्मचारी पथसंचलनात सहभागी झाले होते.