Aalegaon Village : लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने अकोला पोलिसांनी आपल्या प्रतिबंधक कारवाईचा फास आणखी घट्ट आवळला आहे. हातभट्टीची गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा घालत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशांनुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी (Local Crime Branch) ही कारवाई केली आहे.
शनिवारी (ता. 30) मध्यरात्रीच्या सुमारास बाळापूर उपविभागातील आलेगाव परिसरात छापा घालण्यात आला. विनोद रतन जामकर आणि उकर्डा गोविंदा शिंदे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हातभट्टी उद्ध्वस्त करीत 1 हजार 110 लिटर मोहाचा सडवा आणि 1 लाख 11 हजार रुपयांची 100 लिटर गावठी दारू जप्त केली आहे. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल एकूण 1 लाख 21 हजार रुपयांचा आहे. अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक गोपाल जाधव, कर्मचारी रवींद्र खंडारे, महेंद्र मलीये, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, अनिल राठोड, अशोक सोनवणे यांनी ही कारवाई केली.