Home » Amit Shah Akola Vist : शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

Amit Shah Akola Vist : शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

Lok Sabha Election 2024 : राजेश मिश्रा यांच्यासह अनेक जणांना केले नजरकैद

by नवस्वराज
0 comment

Akola : लोकसभा निवडणूक पूर्व आढावा बैठकीसाठी अकोल्यात आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले. आता या आंदोलनकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शिवसेना अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार होते. मंगळवारी सकाळपासूनच पोलिस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेते व कार्यकर्त्यांवर पाळत ठेऊन होते.

शिवसेनेचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, तरुण बगेरे, नितीन ताकवाले, गजानन चव्हाण, शरद तुरकर, अनिल परचुरे हे आंदोलन करतील असे पोलिसांना वाटत होते. सोमवारी (ता. चार) रिधोऱ्याजवळ शाह यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेले बॅनर्स अज्ञात व्यक्तीने फाडल्याने पोलिस सतर्क झाले होते. अशात शाह यांचे अकोल्यात आगमन होताच अकोल्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते शाह यांना भेटण्यासाठी रवाना झालेत. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यावर व जिल्ह्यातील समस्यांबाबत शाह यांना निवेदन देण्यासाठी ही मंडळी निघाली होती.

आक्रमक भूमिका

अकोला पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तातडीने राजेश मिश्रा व त्यांच्या समर्थकांना रोखले. मिश्रा यांच्यासह उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, तरुण बगेरे , अनिल परचुरे, गजानन चव्हाण, शरद तुरकर, नितिन मिश्रा, रुपेश ढोरे, देवा गावंडे, अनिल शुक्ला, विश्वास शिरसाट, रवी मडावी, राजेश इंगळे, संजय अग्रवाल, मानवटकर, रुपेश फाटे, राधे भय्या, दशरथ मिश्रा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतरही शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी समन्वयकांची भूमिका पार पाडत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी प्रंशात माने यांच्याशी बोलणे करून दिले. आपण कोणतेही आंदोलन करणार नसून जिल्हावासियांच्या समस्यांची जाणीव केंद्रीय गृहमंत्र्यांना करून देण्यासाठी जात असल्याचे मिश्रा यांनी यावेळी सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना हॉटेल जलसाकडे जाण्यापासून थांबवित तत्काळ ताब्यात घेतले. देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्यादरम्यानही राजेश मिश्रा व त्यांच्या समर्थकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!