Home » Akola Water Supply : महापालिका आयुक्तांनी केली महानची पाहणी

Akola Water Supply : महापालिका आयुक्तांनी केली महानची पाहणी

Minicipal Corporation : जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा योजनेचा घेतला आढावा

0 comment

Akola : नव्याने रुजू झालेले महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. 8 मार्च रोजी त्यांनी महान येथील धरण व जलशुद्धिकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. महान धरणातून अकोला महानगर तसेच नजीकच्या खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. आयुक्‍तांनी महान धरणातील जलसाठा आणि पाण्‍याच्‍या आरक्षणा बाबत तसेच जलशुध्‍दीकरण केंद्रात होणाऱ्या प्रक्रियेबाबत संपुर्ण माहिती घेतली. याचसोबत जलशुध्‍दीकरण केंद्र आणि शहरात मनपाव्‍दारा करण्‍यात येणा-या पाणी पुरवठ्याच्‍या कामातील अडी-अडचणी जाणून घेतल्‍या.

अकोलेकरांसाठी महान धरणातून 24 दलघमी जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. परंतू शहराची वर्तमान तसेच भविष्यातील लोकसंख्या ध्यानात घेता जलसाठ्याचे आरक्षण वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. हा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने स्वीकारल्यास सर्वप्रथम महान धरणातील गाळाचा उपसा करून धरणाची उंची वाढवावी लागेल. धरणाची पाहणी करताना जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे, आयुक्‍त यांचे स्विय्य सहायक जितेंद्र तिवारी, अभियंता संदीप चिमणकर, आशिष भालेराव तसेच महान धरण आणि जलशुध्‍दीकरण केंद्रातील कर्मचारीही उपस्थिती होते.

‘अमृत’साठी इच्छा शक्तीची गरज

केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत अभियान’ योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा योजनेसाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये आठ नवीन जलकुंभांची उभारणी करणे तसेच शहरातील मुख्य व अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे बदलण्याचा समावेश होता. शासनाने ‘अमृत अभियान’ योजनेचा दुसरा टप्पा मंजूर केला असला तरी, मनपाला पाणीपुरवठ्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ही योजना मार्गी लावण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असून त्यासाठी आयुक्त डॉ. सुनील लहाने हे प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!