Home » Lok Sabha Election 2024 : खासदारासोबत अकोला पश्चिमचा नवा आमदारही ठरणार

Lok Sabha Election 2024 : खासदारासोबत अकोला पश्चिमचा नवा आमदारही ठरणार

Akola West Constituency : निवडून येणाऱ्या नवीन सदस्याला मिळणार फक्त 5 महिन्यांचा कार्यकाळ

by admin
0 comment

Akola : अकोला भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अकोला विधानसभेच्या पश्चिम मतदारसंघाची पोटनिवडणूक लोकसभा निवडणूकी सोबत जाहीर झाली आहे. निवडून येणाऱ्या नवीन सदस्याला जवळपास 5 महिन्यांचा कार्यकाळ मिळेल.

भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. ‘मविआ’तील शिवसेना ठाकरे गटाने मात्र सध्या वाट बघण्याची भुमिका घेतली आहे.

लढतीचे चित्र लवकरच स्पष्ट होणार

भाजपची उमेदवारा बाबतची चाचपणी सुरू आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे ज्येष्ठ पुत्र कृष्णा शर्मा पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. पश्चिममधून काँग्रेस देखील लढण्यास इच्छुक असून, येत्या दोन-तीन दिवसात प्रदेश स्तरावरुन सूचना मिळण्याची शक्यता असल्याचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीने जानेवारी महिन्यात संभाव्य पोटनिवडणुकीसाठी बैठक घेऊन उमेदवाराचे नावही पक्ष श्रेष्ठींकडे पाठवले आहे. ‘वंचित’ यावर ठाम असल्याचे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे म्हणाले. निवडणुकीच्या अधिसूचनेची आम्ही सध्या वाट बघतो आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांनी सांगितले. यावरून सर्वच राजकीय पक्ष पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सूक असल्याचे दिसून येते.

2019 च्या निवडणुकीत भाजपला 73 हजार 262, मविआतील काँग्रेसला 70 हजार 669 आणि वंचित बहुजन आघाडीला 20 हजार 687 मते मिळाली होती. त्यावेळी भाजपसोबत शिवसेनेचा ठाकरे गटही होता. काँग्रेसचा अडीच हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. मात्र यावेळी ठाकरे गट महाविआत असल्यामुळे, भाजपपुढे मताधिक्य टिकवून ठेवण्याचे आव्हान राहणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!