Akola : आगामी लोकसभा निवडणूक व जिल्ह्यात मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात येत आहे. अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सर्व पोलिस उपअधीक्षक, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी असे एकुण 42 अधिकारी व 240 अंमलदार यांनी नाकाबंदी केली. नाकाबंदीत प्रभावी कारवाई करण्यात आली.
नाकाबंदीदरम्यान रिफ्लेक्टर जॅकेट व टॉर्च घेत झिगझॅक पद्धतीने बॅरेकेटिंग करण्यात आले. प्रत्येक वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक नोंदविण्यात आला. 297 दुचाकी व 239 चारचाकी अशा एकूण 536 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 91 वाहनचालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली. त्यांना एकूण 32 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला. 174 समन्स, 59 बेलेबल वॉरंट, 19 नॉनबेलेबल वॉरंट जारी करण्यात आले. 68 निगराणी बदमाश व 29 माहितीगार गुन्हेगार तपासण्यात आलेत. मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 122 प्रमाणे एकूण 09 जणांवर कारवाई करण्यात आली. भारतीय हत्यार कायदयान्वये 05 कारवाई करून 05 शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण 57 हॉटेल लॉज व 53 एटीएम केंद्र तपासण्यात आलेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये 08 कारवाई करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह हे स्वत: ‘फिल्ड’वर उतरले आहेत. त्यांनी जिल्ह्यात गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, याकरीता अशा प्रकारचे वेळोवेळी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. 2024 मध्ये एकूण 41 कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.