Home » Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेमुळे अकोल्यात ‘आप’चा भडका

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेमुळे अकोल्यात ‘आप’चा भडका

Aam Admi Party : मदनलाल धिंग्रा चौकात केली निदर्शने

by admin
0 comment

Akola Politics : दिल्लीतील मद्यधोरण प्रकरणात कथित सहभाग असल्याच्या कारणावरून सक्तवसुली संचालनालयाने (ED) आम आदमी पार्टीचे संस्थापक, राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. केजरीवाल यांना अटक होताच देशभरातील विरोधी पक्षांनी भाजपला ‘टार्गेट’ केले आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ देशभरातील ‘आप’ कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. अटक बेकायदेशिर असल्याचा आरोप करत ‘आप’ने अकोला शहरातही आंदोलन केले. ‘आप’ आणि इंडिया आघाडीच्यावतीने नवीन बस स्टॅन्ड समोरील मदनलाल धिंग्रा चौकात निषेध आंदोलन केले.

आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक कैलास प्रांजळे, महानगर संयोजक हाजी मसूद अहमद, ज्ञानेश्वर साकरकार, प्रदिप गवई, संदीप जोशी, दर्पण खंडेलवाल, आकिब खान, अरविंद कांबळे, विजय चक्रे, काजी लियाकतअली, संतोष दाभाडे, सागर प्रांजळे यांच्यासह काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, साजिद खान पठाण आदी आंदोलनात सहभागी झालेत.

ईडी नावाच्या स्वायत्त संस्थेचा भाजपच्यावतीने वापर होत आहे. देशातील सत्तेच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीर अटक करून दडपशाही केली जात आहे. यामुळे देशभारत भाजपाविरोधी वातावरण तयार होत आहे. अशात ‘आप’ इंडिया आघाडीत सहभागी झाल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे चिडून जात ईडीमार्फत भाजप कारवाई करीत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अशा सुडातूनच अटक केल्याच्या आरोप आम आदमी पार्टी व काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसने दिले निवेदन

भारतीय जनता पार्टीला निवडणूक काळात मिळालेले रोखे सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशिर ठरविले आहेत. या रोख्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये भाजपला मिळाले आहेत. असंवैधानिक मार्गाने हा पैसा भारतीय जनता पार्टीला मिळाला असल्याने तो भाजपकडून तत्काळ जप्त करण्यात यावा. काँग्रेस पक्षाचे गोठवलेले सर्व बँक खाते त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता काँग्रेसकडून करण्यात आली आहे. एका खासगी कंपनीने नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी पानभर जाहिरात छापली. निवडणूक काळात ही जाहिरात झाल्याने त्यासाठी झालेला खर्च भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षांच्या खात्यावर लावण्यात यावा, असेही काँग्रेसने नमूद केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!