भुषण इंदोरिया | Bhushan Indoriya
Akola Crime : अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्याचे प्रमाणे वाढत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. अशाच एका कारवाईत कागजीपुरा ते मोमिनपुरा भागात नाकाबंदी करीत पोलिसांनी कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशाची सुटका केली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांना गोवंश वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कागजीपुरा व मोमिनपुरा भागात नाकाबंदी करण्यात आली. गोवंश व जनावरे कत्तलीकरीता घेऊन येणारे दोन चारचाकी मालवाहू वाहन पोलिसांनी अडविले. वाहनात 25 गोवंश जनावरे होती. या पशुधनाची किंमत अंदाजे पाच लाख रुपये आहे.
गुन्हे शाखा पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद सुफियान मोहम्मद नासीर (वय 21, रा. खडकपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर) याला ताब्यात घेत पुढील तपाससाठी रामदासपेठ पोलिसांकडे सोपविले. वाहनातील गोवंशाला पुढील देखभालीसाठी आदर्श गोशाळा म्हैसपूर येथे पाठविण्यात आले. पोलिसांनी 2024 मध्ये आतापर्यंत अशा प्रकरणात 40 दिवसात एकूण 14 गुन्हे दाखल केले आहेत. 51 गोवंशांना जीवदान देण्यात आले आहे.
गोवंश तस्करीप्रकरणात अकोला पोलिसांनी 2023 मध्ये एकूण 219 गुन्हे दाखल केले आहेत. 637 गोवंशांना त्यातून जीवदान मिळाले आहे. गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीविरुद्ध आता व्यापक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जाहीर कले आहे.
मोमिनपुरा परिसरातील ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक गोपाल जाधव, कर्मचारी दशरथ बोरकर, फिरोज खान, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, गोकुल चव्हाण, रवी खंडारे, अब्दूल माजीद, सुलतान पठान, खुशाल नेमाडे, अविनाश पाचपोर, महेंद्र मलीये, शेख वसीमोद्दीन, इजाज अहमद, लिलाधर खंडारे, मोहम्मद अमीर, अमोल दीपके, स्वप्नील खेडकर यांनी केली.