Nagpur : ओबीसी मंत्रालयातून ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ब्राह्मण सामाजातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत घटकातील तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रसिद्ध केले आहे.
ओबीसी विभागाने ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ओबीसी विभागामार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास घटकासाठी (ईडब्ल्यूएस) अमृत संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेसाठी ओबीसी मंत्रालयातून निधी वितरित केला जातो. आता परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी ओबीसींचा निधी दिला जाणार आहे.
ओबीसी मंत्रालायामार्फत ब्राह्मण जातीतील आर्थिक मागास घटकातील तरुणांना व्यवसायिक मदतीसाठी परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासाठी निधीची तरतूद करावी, म्हणून मुख्यमंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभागाला आदेश देत आहेत, हे अयोग्य आहे. असे ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोर्राम म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठक झाली. त्यात ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला होता. हा प्रस्ताव लवकर मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले.