ऋषिकेश जकाते | भूषण इंदोरिया
Rushikesh Jakate |Bhushan Indoriya
Akola : सकल हिंदू समाजतर्फे आयोजित करण्यात आलेले वीर-वीरांगना संमेलन अकोल्यात संपन्न झाले. संमेलनात राष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रवक्ता काजल हिंदूस्थानी ( गुजरात ) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर उद्बोधन केले. उद्बोधनापूर्वी श्री राजेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर खुले नाट्यगृहापर्यंत भव्य मशाल यात्रा काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात सिंधी समाजातील ज्येष्ठ नागरीकांच्या भजनाने झाली. गायत्री बालिका आश्रमाच्या विद्यार्थिनींनी जयघोष करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. देशातील वीरपुरूष आणि वीरांगनांच्या नावाच्या जयघोषकरून काजल हिंदूस्तानी यांनी उद्बोधनाची सुरूवात केली. सकल हिंदू समाजाच्या सहकार्यानेच आपले सामाजिक कार्य सुरू आहे असे काजल म्हणाल्या.
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली. परंतु यासाठी हजारो रामभक्तांनी बलिदान दिल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय समाजाला जातीजातीत विभागून, संस्कृती आणि सभ्यता नष्ट करून भारताचे 58व्या इस्लामी देशात रूपांतर करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे त्या बोलल्या. बॉलीवूडचे सिनेमा, टीव्ही मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) मालिका आणि सिनेमांमधे दाखविण्यात येत असलेला भोगवाद, चंगळवाद, विवाहबाह्य संबंध, अंमली पदार्थांचे सेवन व तस्करी अशा विषयांमुळे सामाजिक आणि कुटुंबव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे स्त्रीवादाची व्याख्या बदलली आहे. यापासून सावध रहावे, असा इशाराही काजल यांनी दिला.
आपल्या मुलांना जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घडवायचे असेल, तर प्रत्येक आईला जिजाऊ व्हावे लागेल, असे आवाहन काजल हिंदुस्थानी यांनी केले. ‘हे भारत की बेटी जागो, हे भारत की नारी जागो, मै तुम्हे जगाने आई हूं..’ या कवितेने त्यांनी उद्बोधनाला विराम दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल सांवल यांनी केले. मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.