अश्विन पाठक | Ashvin Pathak
Akola : अकोला महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील शंकरनगर आपातापा रोड हनुमान मंदिर रेल्वे क्वार्टरपासून ते चौरसिया यांच्या शेतापर्यंत नागरिक दलितेत्तर 2022-23 निधीतून 70 लाखाचा मुख्य नाला बांधण्यात आला. या कामामध्ये झालेल्या निष्कृष्ट दर्जाची वारंवार निवेदन व तक्रारी करून चौकशी न झाल्यामुळे येथील नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
प्रभागातील शंकर नगर व लाडिस फाईल भागातील नाल्याची, रोडची समस्या घेत नागरिकांनी महानगरपालिका उपायुक्त नीला वंजारी यांना निवेदन दिले. सात दिवसात महानगरपालिकेने संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी, इंजिनिअर यांच्यावर कारवाई न केल्यास महानगरपालिकेवर धडक मोर्चा आणण्यात येईल, असे निवेदन देण्यात आले.
प्रभाग क्रमांक दोनच्या काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका चांदनी रवी शिंदे, आरोग्य सेवा सेलचे जिल्हा अध्यक्ष व अकोला महानगर काँग्रेस कमिटी महासचिव रवी श्रीराम शिंदे, प्रभागातील गोविंद हरिश्चंद्र इनरकर, भारती राजेश वाहने, लता गणेश मस्के, अनिता गणेश बाभुळकर, उज्ज्वला रवी शिंदे, रेखा गजानन बांबुडकर, रजनी विनोद वाहने, वंदना मधुकर गोळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.