Gadchiroli : वैनगंगा नदीच्या पात्रात डोंगा उलटल्याने सुमारे 10 महिला बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या गणपूर गावातील पाच महिलांचा यात समावेश आहे. यातील एका महिलेचा मृतदेह हाती लागला आहे. अन्य बेपत्ता महिलांचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनाने ‘नवस्वराज’ला दिली.
डोंग्यातील महिला या चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथे कापूस वेचणी करण्यासाठी जात होत्या. या भागातील अनेक ग्रामस्थांना वैनगंगा नदीच्या पात्रातून डोंग्यातूनच प्रवास करावा लागतो. नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा अचानक उलटला. डोंग्यात बसलेल्या पाच महिला नदीपात्रात बुडाल्या. धावाधाव करीत महिलांना वाचवेस्तोवर एकीचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बचाव दलांनी वैनगंगा नदीचे पात्र गाठले. त्यानंतर शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला वैनगंगा नदी विभाजते. गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर नदीच्या काठावर आहे. गणपूरवरून चंद्रपूर जिल्ह्यात येण्यासाठी अनेकांना डोंग्यातून वैनगंगा नदी पार करावी लागते. शेतात कापूस वेचणी करण्याकरिता गणपूर येथील 10 महिला डोंग्याने गंगापूर टोककडे निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात घडला.