Akola Roads : अकोल्यातील तीन मुख्य रस्त्यांची दुरुस्ती होणार
अकोला | Akola : रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न अकोला महानगरातील रस्ते बघून पडतो. नवीन बनवण्यात आलेल्या काँक्रिट रस्त्यांचे एकाच वर्षात तीनतेरा वाजले. रस्त्यांच्या निकृष्ट दर्जांबद्दल खुप ओरडा आणि आंदोलन झालेत. चौकशी समिती नेमली होती परंतु सर्व थंड बस्त्यात गेले. (Akola Roads Needs To Be Improved As Soon As Possible)
आता अकोला महानगरातील तीन प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. यात सिव्हिल लाइन्स चौक ते मुख्य पोस्ट ऑफिस, टावर ते रतनलाल प्लॉट चौक, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक या रस्त्यांचा समावेश आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशिष्ट केमिकलचा वापर केला जाणार आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीपोटी दीड कोटी रूपये खर्च होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या निधीतून हा खर्च केला जाईल.
इंदूर येथील एका कंपनीला रस्ते दुरूस्ती कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कामाला सुरुवात देखील झाली आहे. रस्त्यांचे दुरुस्तीकाम सफल होणार की शासनाचे दीड कोटी रूपये पाण्यात जाणार याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही दूरवस्था झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांसोबत अनेक भागातील रस्त्यांची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात महापालिका व शासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.