नागपूर : मणिपूर येथे गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी हा हिंसाचार गंभीर असल्याचे मत व्यक्त करीत सर्वांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार अत्यंत चिंताजनक आहे. ३ मे २०२३ पासून येथे हिंसक घटना सुरू आहेत. येथे आयोजित निषेध रॅलीनंतर मणिपूरमध्ये सुरू झालेल्या हिंसाचार आणि अनिश्चिततेचा निषेध केला पाहिजे, असे होसबळे म्हणाले. शतकानुशतके परस्पर सौहार्द आणि सहकार्याने शांततापूर्ण जीवन जगणार्यांमध्ये उफाळून आलेली अशांतता आणि हिंसाचाराची लाट अजूनही थांबलेली नाही, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भयंकर दु:खाच्या काळात विस्थापित व्यक्ती आणि मणिपूर संकटात ५० हजाराहुन अधिक पीडितांच्या पाठीशी उभा आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंसाचार आणि द्वेषाला स्थान नाही. सध्याच्या संकटाच्या काळात एकमेकांमधील विश्वासाची कमतरता दूर करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना करतो, असे होसबळे यांनी नमूद केले. दोन्ही समुदायांकडून सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे. मेईटी लोकांमधील असुरक्षितता आणि असहायतेची भावना आणि कुकी समुदायाच्या खऱ्या चिंतेवर एकाच वेळी मार्ग काढून त्याचे निराकरण केले जाऊ शकते, असे मत होसबळे यांनी व्यक्त केले.