अकोला : फेसबुकवरील ओळखीदरम्यान आपली खोटी माहिती देत ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या व तिची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या सय्यद नावाच्या इसमास अकोट पोलिसांनी अटक केली आहे. सय्यद याने आपले नाव प्रेम पाटील असे खोटे सांगितले होते.
३२ वर्षीय महिलेला एक दिवशी फेसबुकवरून प्रेम पाटील या नावाने रिक्वेस्ट आली. महिलेने ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर समोरून सदस्य हा प्रेम पाटील या नावाने तिच्याशी गप्पा करू लागला. त्यानंतर सय्यद हा महिलेचा पती नसताना तिच्या घरी येत होता. त्याने घरी आल्यावर महिलेच्या मोबाईलमधुन नातेवाईकांचे क्रमांक मिळविले. दोघांमध्ये झालेली चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत सय्यदने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. नाईलाजाने महिलेने ती पूर्ण केली. यादरम्यान समोरील व्यक्ती प्रेम पाटील नसून सय्यद असल्याचे महिलेला कळाले. त्यामुळे तिला धक्का बसला. महिलेकडुन सय्यद याने ३.७० लाख रुपयेही घेतले.
प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहुन महिला अकोटवरून माहेरी गेली. मात्र सय्यदने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. सर्वच प्रकार असह्य झाल्याने व सय्यद याने महिलेच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने हा प्रकार घरी सांगितला. महिलेच्या नातेवाईकांनी अकोट पोलिस स्टेशन गाठत सय्यद शरीफ सय्यद सफी याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. प्रकरणाचा तपास अकोट पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रकाश अहिरे करीत आहेत.