अकोला : जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. शहरात सातत्याने होणारे खून हा चिंतेचा विषय आहे. रविववारी रात्री उशिरा झालेल्या खुनाने पोलिसांच्या चिंतेत भर पडली आहे. अकोला रेल्वे स्थानक गेट क्रमांक दोन येथे काल रात्री ऐन गर्दीच्या वेळी एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अकोला शहरातील बस स्थानकामागील आंबेडकर नगरमध्ये अनिल नावाचा तरुण राहत असून तो बसस्थानक परिसरात दहशत निर्माण करत होता. अनिलवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अकोट फैलमधील कॉम्प्लेक्समध्ये राहणारा सोनू उर्फ रवी त्रिपाठी याचे बस स्थानकाच्या बाहेरील आवारात चहाचे दुकान आहे. या दुकानावर काही दिवसांपूर्वी अनिलचे सोनू उर्फ रवी त्रिपाठीच्या भावासोबत भांडण झाले होते. या भांडणातून रवीच्या भावाला अनिलने जबर मारहाण केली. या मारामारीवर गुन्हाही दाखल झाला. अनिल आणि सोनू उर्फ रवी त्रिपाठी यांच्यातील हा वाद काल चव्हाट्यावर आला, ज्याने अखेर हत्येचे रूप घेतले.
रविवारी ११ जूनच्या रात्री अनिल रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती रवी त्रिपाठीला मिळाली. रवी त्रिपाठी आणि अनिल हे दोघे आमनेसामने आले असता दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये अनिल याला सोनू उर्फ रवी त्रिपाठी याने चाकूने गंभीर जखमी केले, त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी अनिलला अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र कदम व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
खून केल्यानंतर मुख्य आरोपी रवी ओंकार त्रिपाठी याने पोलिसांना आत्मसमर्पण केले आणि मी एकट्यानेच हा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र रामदासपेठ पोलिसांच्या प्रभारी पोलिस निरीक्षकांनी आरोपी त्रिपाठीच्या जबानीवर संशय घेत ज्या आवारातच त्याची हत्या केली. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानंतर या हत्येप्रकरणी आणखी तीन आरोपी समोर आले आहेत. त्याआधारे पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांनी पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. या खून प्रकरणातील आरोपी सोनू गौतम बनसोडे (वय 20, रा. अकोट फाईल), अमर महेंद्र उज्जैनकर (वय 20, रा. आपातापा रोड) आणि अभिजित संभाजी हांडे (वय 23) यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट फैल पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर, प्रशांत इंगळे, अस्लम शहा, गिरीश तिडके, छोटु पवार यांनी ही कारवाई केली.