अकोला : विदर्भात सर्वत्र निर्माण झालेली उष्णतेची लाट ओसरताना दिसत आहे. तापमानात घट झाली असली तरी अकोल्यातील तापमान विदर्भात सर्वांत हॉटेस्ट आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपुरातील पारा ३९ अंश सेल्सिअसवर आला आहे. मात्र अकोल्यातील पारा आजही चाळीशीच्या पारच होता.
भारतीय मौसम विभागाच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार अकोल्यातील पारा गेल्या पाच दिवसांपासून विदर्भात सर्वाधिक आहे. बुधवार, ३१ मे २०२३ रोजी देखील अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २८.१ अंश सेल्सिअस होते. अमरावतीत पारा ४३.४, बुलडाण्यात ४०.३, ब्रह्मपुरीत ४१.४, चंद्रपुरात ४१.८, गडचिरोलीत ४१.२, गोंदियात ४१.४, नागपुरात ४१.१, वर्धेत ४३, वाशीम आणि यवतमाळमध्ये ४२ अंश सेल्सिअस तापमान होते.
गेल्या पाच दिवसांचा विचार केल्यास मंगळवारी अकोल्यात ४२.७, सोमवारी ४२.७, रविवारी ४२.७, शनिवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमान होते. शुक्रवारी पारा ४२.२ अंशांवर होता. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून अकोल्यातील तापमान त्रासदायक ठरत आहे. सकाळी नऊ वाजतापासूनच वातावरणात गरम वाफ जाणवण्यास सुरुवात होते. १५ जूनपर्यंत हा क्रम कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडुन वर्तविण्यात येत आहे.