अकोला : दोन समुदायात झालेल्या हिंसक संघर्षानंतर अकोला येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार, १३ मे २०२३ रोजी अकोल्यातील जुने शहर भागात दोन गट समोरासमोर आले व त्यांनी प्रचंड दगडफेकीला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस, डाबकी रोड पोलिस आणि दंगल नियंत्रण पथक जुने शहरात दाखल झालेत. तोपर्यंत मोठा जमाव जुने शहर पोलिस स्टेशनवर चाल करून गेला होता. आमदार रणधीर सावरकर, भाजपाचे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनीही घटनास्थळ गाठत हिंसक जमावाला समजाविण्याच्या प्रयत्न केला. मात्र लोकांनी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करीत जाळपोळ सुरू केली.
घटनेची गंभीरता ओळखत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पोलिसांना बळाचा वापर करण्याचे आदेश दिले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी शहरात संचारबंदी लागू केली. रात्री बाराच्या सुमारास संचारबंदी लागू करण्यात आल्याचे पोलिसांच्या वाहनांवरून जाहीर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे व जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याशी चर्चा करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे आदेश दिले.
अकोला पोलिसांच्या मदतीसाठी अमरावती येथुन राज्य राखीव पोलिस दलाची अतिरिक्त कुमकही अकोला येथे पाठविण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी देखील अकोला पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडुन परिस्थितीची माहिती घेतली. रात्री उशिरा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेत हैदोस घालणाऱ्यांच्या घरांची झडती सुरू केली. काही दिवसांपूर्वी अकोल्यातील अकोट फैल भागातही तणाव निर्माण झाल्याची घटना अलीकडच्या काळातीलच आहे.
अफवांवर विश्वाास ठेऊ नये
परिस्थिती आता नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असामाजिक तत्वांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टची सत्यता तपासल्याशिवाय अफवा पसरवू नये. असे कृत्य करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले.