Home » अमरावतीत मॉलमध्ये बसून आयपीएलवर सट्टेबाजी

अमरावतीत मॉलमध्ये बसून आयपीएलवर सट्टेबाजी

by नवस्वराज
0 comment

अमरावती : मॉलमध्ये बसून क्रिकेटवर सट्टेबाजी करणाऱ्या एकाला अमरावती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यांवर खेळला जाणारा सट्टा रोखण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्न करीत असले तरी लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करीत सट्टेबाजी करीतच असल्याचे दिसत आहे.

अमरावती शहरातील एका आलीशान मॉलमध्ये बसून एक व्यक्ती सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी शहरातील तापडिया मॉलमध्‍ये छापा घातला. त्यावेहीएका कोपऱ्यात बसून मोबाईलवर सट्टा घेणाऱ्या आरोपीला त्यांनी गजाआड केले. रितेश राजकुमार रामरख्‍यानी (वय ३४, रा. कृष्‍णा नगर, अमरावती) हे पकडण्यात आलेल्या सट्टेबाजाचे नाव आहे. राजापेठ पोलिसांचे पथक गोपनीय माहितीच्‍या आधारे गोपाल नगर चौकातील तापडिया मॉलमध्‍ये पोहोचले. त्यावेळी रितेश रामरख्‍यानी एका कोपऱ्यात बसून मोबाईल अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून सट्टा घेत होता. पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले आणि चौकशी सुरू केली, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, पोलिसांनी त्‍याच्‍या जवळील महागड्या सॅमसंग कंपनीच्‍या फोल्‍डेड मोबाईलची तपासणी केली, तेव्हा खरा प्रकार समोर आला.

रितेश हा मोबाईलच्‍या गुगल क्रोममध्‍ये ओस्टिन-७७७ डॉट कॉम या नावाचे बेकायदेशीर सॉफ्टवेअर आढळून आले. त्‍याच्‍या मोबाईलध्‍ये आयपीएल क्रिकेट सामन्‍यांवर सट्टा घेण्‍याबाबत ध्‍वनिमुद्रणदेखील आढळून आले. बेकायदेशीर अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून तो जुगार चालवित होता. आपल्या मोबाईल अ‍ॅपच्‍या खात्‍यात ३६ हजार रुपये जमा असल्‍याचे रितेशने पोलिसांना सांगितले. दोन मोबाईल क्रमांकावर फोन करून सट्टा घेत असल्‍याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्‍याच्‍याकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!