अकोला : अल्पसंख्यक भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ७५ लाख रुपये एकट्या अकोला जिल्ह्याला मिळाले आहेत. या निधीतून दहिहंडा, चोहट्टा, मजलापूर, चांदूर, नवीन केळीवेळी, बोरगाव मंजू येथे मूलभूत सुविधा व रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विभागाने ८ मे २०२३ रोजी १५० कोटी रुपये मंजूर केल्याची पत्र चंद्रपूर आणि अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
अकोला तालुक्यातील दहीहंडा, मजलापूर, चांदूर, नवीन केळीवेळी, बोरगाव मंजूर येथे रस्त्यांचे मजबुतीकरण, सिमेंटीकरण, पेव्हर ब्लॉकिंग आदी कामांसाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रस्त्यांच्या मजबुतीकरण व सिमेंटीकरणासाठी १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार मंजूर करण्यात आलेला निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अल्पसंख्याक विभागाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.