अकोला : उद्धव ठाकरे यांच्या गटातील फायरब्रॅन्ड आमदार म्हणून ओळखले जाणारे नितीन देशमुख यांच्यासह सव्वाशे जणांविरुद्ध अकोल्याच्या जुने शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
अकोला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानापर्यंत आमदार नितीन देशमुख यांनी पाणी संघर्ष यात्रा काढली आहे. सध्या देशमुखांची नागपूरकडे आगेकूच सुरू आहे. अशात अकोल्यात देशमुख यांनी मोठी मिरवणूक काढत संघर्ष यात्रेला सुरुवात केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बाळापूर व अकोला जिल्ह्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आमदार नितीन देशमुख यांनी गेल्या सोमवारी अकोला येथून नागपूरकरिता संघर्ष यात्रा काढली आहे. राजराजेश्वर मंदिरापासून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली होती. यावेळी शेकडो शिवसैनिकांसह ६९ खेड्यातील ग्रामस्थदेखील सहभाग झाले होते.
जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना नितीन देशमुख यांनी नागरिकांना एकत्र केल्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह १२५ जणांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने यात्रा काढल्याने गुन्हे दाखल केल्यामुळे देशमुख आणि त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यात जमावबंदी कशासाठी लावली, असा सवालही त्यांनी केला. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कोरोनाचा उद्रेक झाला नाही. असा परिस्थितीत केवळ शिवसेना संघर्ष यात्रा काढणार आहे, म्हणून जमावबंदी लागू केली का, असा प्रश्नही त्यांनी आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.