अमरावती : कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात कोणताही संबंध नसताना नाहक बदनामी केल्याप्रकरणी संबंधित युवकांच्या परिवाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमरावतीच्या हमालपुरा भागातून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. ‘लव्ह जिहाद’चा हा प्रकार असून युवकाला खडसावून विचारा असा दबाव राणा यांनी पोलिसांवर आणण्याचा प्रयत्न केला. अशात त्यांनी कॉल रेकॉर्ड केल्याच्या मुद्द्यावरून राजापेठ पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला होता. याप्रकरणातील तरुणीनेही हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार नसून राणा यांनी पूर्ण चौकशी न करताच आपले नाव दुसऱ्या धर्माच्या मुलाशी जोडून गावभर बदनामी केल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. त्यानंतर एका पोलिसाच्या पत्नीनेही एकेरी भाषेत खासदार राणा यांना धारेवर धरले होते. आता याच प्रकरणातील तरुणाच्या परिवाराने तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाण्यात धिंगाणाप्रकरणी राणा यांच्यावर आणखी एक गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे.